महानगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत काँग्रेस्-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हलवण्याचा ठराव केला. ही बातमी वर्तमानपत्रात वाचली आणि पटकन एक जुना प्रसंग आठवला. माझा एक मित्र केळकर संग्रहालयावर डॉक्यूमेंट्री करत होता. त्यासंदर्भात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या आठवणी विचारण्यासाठी मी गेलो होतो. बाबासाहेबांशी बोलताना अनेक आठवणी त्यांनी सांगितल्या आणि बोलण्याच्या ओघात ते बोलून गेले 'आम्ही इतिहास जपण्यासाठी वणवण हिंडलो आणि आज कोणत्याही इतिहासतज्ज्ञाला न विचारता लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हलवण्याच्या चर्चा या पुण्यनगरीत होतात, तेव्हा फार क्लेश होतात.' एखाद्या चोराप्रमाणे पुणे महानगरपालिका प्रशासनाने रात्री २ वाजता हलवला, त्यावरून महापालिकेत शब्दशः राडा झाला आणि पुन्हा एकदा ही आठवण माझ्या मनात ताजी झाली.
मूळात दादोजी कॉडदेवांविषयी या लोकांचा आक्षेप काय आहे? दादोजी कोंडदेव हे शहाजी राजांचे निष्ठावान सेवक होते, पुण्याच्या राज्यकारभारावर त्यांचा प्रभाव होता, पुण्यनगरीची स्थापना करण्यात आनि या भूमीवरून सोन्याचा नांगर फिरवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता, छत्रपती शिवराय आणि जिजाऊ यांच्याशी त्यांचे आपुलकीचे संबंध होते, हे वास्तव कोणीही नाकारत नाहीये. केवळ दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू होते, असे प्रोजेक्शन करण्याला या लोकांचा विरोध आहे. पण मला केवळ एवढाच प्रश्न पडतो की शहाजी राजे आणि छत्रपतींचे निष्ठावान सेवक तसेच पुण्यनगरीच्या स्थापनेत मोलाची भूमिका बजावणारे एक व्यक्तिमत्व म्हणून दादोजींचा पुतळा लाल महालात बसवला किंबहुना आहे तसाच ठेवला तर बिघडले कुठे?
या लोकांचा दुसरा आक्षेप असा की '(म्हणे) राजमाता जिजाऊंच्या जवळ दादोजींचा पुतळा असल्याने त्यांचे संबंध जोडले जातात.' या मुद्यावर खरे तर मला या लोकांची कीव वाटते. ज्या महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या नावाचा हे लोक जयघोष करतात, ज्या महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या प्रतिमा हे मिरवतात, त्याच महापुरुषाने स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ लावली, महिलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलला आणि आजच्या काळातही केवळ एक स्त्रीच्या शेजारी पुरुषाचा पुतळा उभा आहे म्हणून हे आक्षेप घेतात? अरे जिजाऊंना आपण महाराष्ट्राची माता मानतो ना? त्यांच्या आदर्श राज्यकारभाराचे आपण दाखले देतो ना? मग एवढ्या शुल्लक घटनेमुळे असे विचार लोकांच्या मनात येउच कसे शकतात? ही विचारांची, दृष्टीकोनांची लढाई आहे, ती आखाड्यात कशाला आणता?
पुण्याचे (माननीय?) महापौर मोहनसिंग राजपाल असे म्हणाले की हा महापालिकेतील नगरसेवकांनी बहुमताने घेतलेला निर्णय आहे आणि नगरसेवकांना लोकांनी निवडून दिल्यामुळे पर्यायाने हा जनतेचा निर्णय आहे. अहो पण या विषयातले नगरसेवकांना खरच किती आणि काय कळतं? (मुळात पुण्यातल्या नगरसेवकांना कशातके किती आणि काय कळतं? हाच संशोधनाचा विषय आहे!) हा विषय इतिहासतज्ज्ञांचा आहे. माझ्यासारख्या एका सामान्य नागरिकाला कळतं की इतिहासतज्ज्ञांची समिती नेमणे हा या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा सर्वमान्य तोडगा होता. पण आपण 'राष्ट्रवादी काँग्रेसचे' नव्हे, तर संपूर्ण पुणे शहराचे महापौर आहोत, हे वास्तव विसरून निर्णय घेणार्या या आंधळ्या महापौरांना काय म्हणावे?
महपौरांची सगळ्यात हाईट प्रतिक्रिया म्हणजे 'रात्री २ वाजता पुतळा हलवण्याचा निर्णय प्रशासनाचा होता, मी त्या वेळेस झोपलो होतो!' कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण करणार्या इतक्या महत्त्वाच्या निर्णयात महपौर सहभागी नसतील, तर त्यांचा प्रशासनावरील वचक स्पष्टच दिसतोय! आणि सर्वसामान्य पुणेकरांच्या दैनंदीन जीवनावर परिणाम करणार्या या कृतीच्या वेळी पुण्याचे 'प्रथम नागरिक' जर झोपा काढत असतील, तर त्यांचा आम्हा पुणेकरांना किती अभिमान वाटायला हवा?
आणि या सगळ्या गोंधळात भर घालण्याची (कु)संधी विरोधी पक्ष तरी कसे सोडणार? सत्ताधारी पक्षाने निर्माण केलेल्या संशयी वातावरणाचा फायदा घेत भाजप-शिवसेनेच्या नगरसेवकंनी पुणे महानगरपालिकेत न भूतो न भविष्यती असा गोंधळ घातला. आम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचे 'कर्तृत्व' आम्ही सगळ्याच न्यूज चॅनेलवरून डोळे भरून पाहून घेतले. ऑन कॅमेरा हे लोक जर एवढा गोंधळ घालू शकत असतील, तर कॅमेरा समोर नसतना हे किती बेफाम होत असतील, याचा विचारच न केलेला बरा! यांनी काचा फोडल्या. टेबलं, खुर्च्या तोडली. सभागृहाचे अतोनात नुकसान केलं. या लोकप्रतिनिधींना (खरं तर गुंड तरी वेगळं काय करतात हो?) त्याची ना खंत ना फिकीर दिसून आली. आणि का दिसावी? मुळात राजकारण हे समाजहितासाठी नव्हे तर सत्तेसाठी करायचं असतं, हे जवळपास सर्वच पक्षांनी मान्य केलेलं आहे. आणि सत्ता मिळवायला ज्या निवडणुका जिंकायच्या, त्यातही चारित्र्य, क्षमता वगैरे वगैरे नुद्दे इतिहासजमा झालेले आहेत. म्हणजे इतका गोंधळ घातला तरीही निवडून येण्याची खात्री आहेच. कारण आम्ही म्हणजे फक्त नावाला मतदार हो, निवडणुकीतले मतदार तर पैसे चारून आणले जातात आणि त्या लोकांना लोकप्रतिनिधींच्या कारभाराशी काही देणे-घेणेच नसते! कालपासून न्यूज चॅनेलवर प्रत्येक पक्षाचे प्रतिनिधी वारंवार लोकशाहीचा उल्लेख करत आहेत. लोकशाहीची एवढी विटंबना करून वर लोकशाहीच्या नावाने गळे काढणार्या आमच्या प्रतिनिधींच्या हातात आमची लोकशाही किती सुरक्षीत आहे, हे काल आम्हालाही कळून चुकलं.
खरे तर माझ्या पुणे शहरासमोर प्रश्न काय कमी आहेत? आमचे रस्ते कायमच उखडलेले असतात. किती ही पाउस पडला तरी पाणी कपात आमच्या माथी मारलीच जाते. भारनियमनमुक्त शहर हे फक्त मीडियासमोर बोललं जातं, वास्तव फारच वेगळं आहे. गेल्या ८ वर्षात घरांच्या किमती ६ पटीने वाढल्यात. आय. टी. सिटी म्हणता, पण आञ. टी. पार्क पर्यंत जाण्यासाठी सार्वजनिक वहातूक व्यवस्था नाहीये. मेट्रो, रिंग रोड सारख्या योजना गेल्या कित्येक वर्षांपासून केवळ कागदावरच आहेत. अशा असंख्य प्रश्नांची यादी आम्ही पुणेकर देऊ शकतो. पण आम्हाला काय वाटते याच्याशी देणं घेणं आहे कोणाला? एक पक्ष जातीय राजकारण करतोय आणि दुसरा धार्मिक. येत्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाने आपली वोट बँक या निमित्ताने स्पष्ट केलीय, एवढेच आम्हाला कळले. आता धार्मिक राजकारण करणार्या पक्षांना पाठिंबा द्यायचा?, जातीय राजकारण करणार्या पक्षाला सत्ता द्यायची? का 'सिस्टीम' ला शिव्या घालत निवडणुकांवर बहिष्कार टाकायचा? एवढेच ठरवणे आमच्या हातात आहे. कारण विकासाभिमूख राजकारण करणारा कोणताही पक्ष आज आम्हाला दिसत नाहीये.
ता. क. - पुण्यात नगरसेवकांनी घातलेल्या हैदोसाची दृष्य न्यूज चॅनेलवर पाहून शिक्षणासाठी येथे आलेल्या माझ्या एका मित्राचा मला फोन आला. तो म्हणाला "ज्या बिहारच्या जातीय आणि हिंसक राजकारणाला तुम्ही मराठी लोक शिव्या घालत होतात, त्याच बिहारी जनतेने आज 'प्रोग्रेसीव' (विकासाभिमूख) राजकारणाचा रस्ता धरलाय आणि ज्या वैचारिक राजकारण आणि समाजकारणाचा तुम्हा पुणेकरांना अभिमान होता, त्याच पुण्यात आज पुन्हा जातीय राजकारण आपले पाय रोवतंय. काळ काय पटकन बदलतो नाही?"